Abstract—भारताच्या वर्तमान सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीमध्ये गांधीविचारांचे मोठे योगदान राहिलेले आहे. विदेशात नेहमीच भारताची एक वेगळी तथा चांगली ओळख ही गांधीजींच्या विचारामुळे राहिलेली आहे. गांधीजी एक व्यक्ती म्हणून ते केव्हाच जागतिक झालेले आहेत. त्यांचे कर्तृत्व हे भारताच्या सीमा ओलांडून तेव्हाच वैश्विक झालेले आहे. त्यांचा वैचारीक वारसा, त्याग, राष्ट्रसाठी त्यांनी केलेली सेवा ही समस्त भारतीयासाठी केवळ अभिमानास्पदच नाहीतर उपकारास्पद आहे. “भावी पिढ्यांना खरेही वाटणार नाही, की हाडामांसाचा असा कुणी या पृथ्वीवर होऊन गेला,“ जगविख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म. गांधीसंदर्भात काढलेले हे उदगार गांधीजींच्या भारत आणि जागतिक योगदानाचे मूल्य अधोरेखित करते. तथापि वर्तमान परिस्थिती आणि वर्तमान घटना-घडोमोडींचा अन्वायार्थ लावत गांधीजींच्या तत्कालीन भूमिका आणि विचारांची प्रासंगिकता तपासण्याचे प्रयत्न आणि त्यातील गुण-दोष शोधण्याचा प्रकार तथाकथीत विचारवंताकडून होताना दिसत आहे. परंतु तत्कालीन परिस्थितीमधील गांधीजींच्या विचाराचा अंतस्थ हेतू हा देश उभा करण्याचा होता, घडवण्याचा होता; हे भाण मात्र आपण विसरतो. अनेक पंथ, जाती-धर्म, कमालीची वैविध्यता सांभाळत आज जो खंडप्राय भारत अखंड उभा आहे त्याची पायाभरणी गांधीजींच्या उदारमतवादी-मानवतावादी विचारात असल्याचे दिसते. त्यांनी त्याकाळी घातलेल्या वैचारीक पायावरच भारत देशाचे आजचे स्वरुप टिकवून राहिल्याचे दिसते.